शनिवार, 20 अक्तूबर 2012

वर्धा शहराच्‍या सर्वांगिन विकासासाठी नगरोत्‍थान योजनेत प्रस्‍ताव सादर करा - राजेंद्र मुळक


      


      * शहरातील विकास कामा संदर्भात नगरसेवकासोबत चर्चा  
      * प्रशासकीय इमारतीसाठी  साडेचार कोटीचा प्रस्‍ताव
      * शहराला समतोल पाणीवाटपाची दक्षता घ्‍या      
       वर्धा, दिनांक 20 –वर्धा शहरातील विविध विकास कामासह नागरी सुविधांसाठी राज्‍य व केन्‍द्र शासनाचया विविध योजनामधून निधी  मिळविण्‍यासाठी  तात्‍काळ  प्रस्‍ताव  तयार करा अशा सुचना पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी आज दिल्‍यात.
          वर्धा शहरातील विविध विकास योजनांचा आढावा तसेच नागरी सुविधा संदर्भात नगराध्‍यक्ष आकाश शेंडे यांचेसह सर्व नगरसेवकांची विशेष बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजीत करण्‍यात आली होती. यावेळी  पालकमंत्रयांनी  नगरसेवकांसोबत चर्चा करुन नागरी सुवीधांमध्‍ये  वाढ करण्‍यासंदर्भात चर्चा केली.
        बैठकीस मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने , निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री.गाडे, नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी विजयकुमार खोराटे, जिल्‍हा नियाजन अधिकारी प्रकाश डायरे तसेच सर्व पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते.
       वर्धा नगर परिषद ही अ वर्ग नगर परिषद असून, येथील आस्‍थापना खर्च व ईतर खर्च भागविण्‍यासाठी  मालमत्‍ता  कर ईतर उत्‍पन्‍नातून  खर्च करण्‍यात  येतो. यामध्‍ये   आस्‍थापना खर्चावर 59 टक्‍के  निधी  खर्च होत असल्‍यामुळे  आकृतीबंद नियंत्रीत करणे आवश्‍यक असल्‍याचे सांगताना पालकमंत्री राजेंद्र मुळक म्‍हणाले की  पिण्‍याच्‍या पाण्‍यासह रस्‍ते, नागरी सुविधा सौंदर्यीकरण आदी विकासकामांसाठी  केन्‍द्र व राज्‍य शासनाच्‍या विविध योजनांसाठी प्रस्‍ताव तयार करुन  शासनाकडे पाठविणे आवश्‍यक आहे.
     वर्धा शहराला येलाकोळी व पवनार येथून पिण्‍याचे पाणी  पुरविण्‍यात येते . परंतू  पिण्‍याच्‍या पाण्‍याचे समतोल वाटपासाठी  आवश्‍यक बदल तसेच नवीन वस्‍त्‍यांमध्‍ये  पाणी वितरणासाठी  आवश्‍यक असलेला प्रस्‍ताव  सुजल योजनेमध्‍ये तात्‍काळ पाठवावा. राज्‍य शासनाकडून  या प्रस्‍तावाला  मंजूर करण्‍याबाबत संपूर्ण सहकार्य देण्‍यात येईल. असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
  
                                                                                  

      केन्‍द्र व राज्‍य शासनाकडून नगर परिषदांसाठी विविध योजनांसाठी निधी उपलब्‍ध  करुन देण्‍यात येतो. त्‍यामुळे  भुमीगत ग्रेनेज व्‍यवस्‍था, अंतर्गत रस्‍त्‍यांची कामे ,पाण्‍याच्‍या सुविधांमध्‍ये वाढ करणे व त्‍योचे बळकटीकरण करणे, सौंदर्यीकरण करणे आदी विकास कामांसाठी  प्रस्‍ताव तयार करुन  पाठवावे. अशी सुचनाही पालकमंत्र्यांनी  मुख्‍याधिका-यांना दिली.
        वर्धा नगर परिषदेसाठी नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्‍ताव राज्‍य शासनाकडे पाठविण्‍यात आला असून, या प्रस्‍तावाला नगर विकास विभागातर्फे  तात्‍काळ मंजूरी देण्‍याबाबत मुंबई येथे विशेष बैठक घेण्‍यात येईल तसेच  जिल्‍हा नगरोत्‍थान  कार्यक्रमामधूनही निधी  उपलब्‍ध  करुन देण्‍यात येईल असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
       वर्धा नगर परिषदेची  प्रशासकीय इमारत चार हजार चौरस फूट बांधकाम असलेली तीन मजली ईमारत बांधण्‍यात येणार असून, यासाठी सुमारे 4 कोटी 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.  
          वर्धा शहरातील जुन्‍या तलावाचे सौंदर्यीकरण तसेच सार्वजनिक बगिच्‍यांची निर्मिती, नाट्यगृहाचे बांधकाम, घरकुल योजनेला निधी मिळवून देणे शहरातील कचरा उचलण्‍याची व्‍यवस्‍था करणे, आदी  विविध प्रश्‍नासंदर्भात नगरसेवकांनी  सुचना केल्‍यात. नगरसेवकांनी केलेल्‍या   सुचनेनुसार  प्रभागनिहाय विकास कामांची यादी तयार करुन  त्‍यांना निधी मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍न  करण्‍यात येतील अशी ग्‍वाही  पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
          प्रारंभी  नगराध्‍यक्ष  आकाश शेंडे यांनी वर्धा शहरातील विविध प्रश्‍नाबाबत पालकमंत्र्यांना  माहिती दिली. तसेच वर्धा नगर परिषदेमध्‍ये तांत्रिक कर्मचारी कमी असल्‍यामुळे प्रशासकीय विकासकामांना गती  मिळू शकत नाही तसेच केन्‍द्र व राज्‍य  शासनाकडून विविध योजनांमध्‍ये निधी उपलब्‍ध  करुन देण्‍याची  विनंती केली.
          मुख्‍याधिकारी  विजयकुमार खोराटे यांनी  वर्धा शहरात सुरु असलेली विविध कामे त्‍यासाठी  लागणारा निधी  तसेच प्रशासकीय खर्च  आदीबाबत बैठकीत  माहिती दिली.
                                                0000000